सलाम

का हळहळतो माणूस
शूर वीरांप्रती…
ते शौर्य तसे असते
ध्यास एकच मनी
रक्षण सिमेचे…
ती जिद्द तशी असते
शान राखण्याची
तिरंगा जपण्याची…
रक्त सळसळत असते
हिम पर्वताच्या कुशीत
उणे तापमान जरी…
जाणीव फक्त असते
शत्रू संपवण्याची…
विना ऑक्सिजन
ज्योत तेवत ठेवण्याची…
माणसात एकटा पडतो इथे माणूस
जिथे बर्फा खेरीज
न कसलं अस्तीत्व
तिथे सामर्थ्य एकट्याच…
रक्षीतो आपणासी निर्जन राहून
बंध राष्ट्र भक्तीचं
वेड देश प्रेमाचं…
साथ काळाची असते
काळच घात करतो…
धवल बर्फाचा पर्वत
अचानक कोपतो…
कवेत घेतो
राष्ट्रभक्तांस
काय गुन्हा ??
तो इतका निर्दयी होतो
जो भोगतो त्यालाच जवळ घेतो…
पांघरून बर्फाच त्यांस देतो
तरीही हारत नाही
संघर्ष करतो
एका जिद्दीनं, उर्मीनं
पण दैवापुढे नाही चालत काही
खुजे ठरतो आपणही
भारत मातेचा सच्चा सुपुत्र
लाख मरणे मागे टाकून
शेवटी शहीद होतो…
सलाम त्या संघर्षास..नका विसरू कधी
सलाम त्या वीर मरणास…जे आपल्यासाठी
सलाम त्या धरणी पुत्रांस…जागवा मातृभक्ती
सलाम त्या मरून जगणाऱ्या शूरांस… उरे किर्तीरूपी
सलाम, सलाम आणि सलाम…..
जय हिंद….

नितेश ज्ञानेश्वर पाटील (पालघर,धनसार)
९६३७१३८०३१

शिवचरित्रातून काय शिकावे

आज शिवचरित्रातून काय शिकावे? –

आज शिवचरित्र
हा पदोपदी प्रेरणा देणारा दीपस्तंभ
आहे. शिवचरित्रातून आज आपणाला अनेक
जीवनमूल्ये
शिकता येण्यासारखी आहेत.
शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात
करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांवर अनेक संकटे
चालून आली. अफजलखान, शाहिस्तेखान,
दिलेरखान, सिद्दी जोहर, औरंगजेब अशा असंख्य
शत्रूंशी महाराजांनी मोठ्या धैर्याने
मुकाबला केला. म्हणजे शिवाजीमहाराज
संकटसमयी रडणारे नव्हते, तर लढणारे होते.
आज तरुणांनी संकटसमयी हताश,
निराश न होता मोठ्या आत्मविश्वासाने संकटांविरुद्ध
लढण्याची प्रेरणा शिवचरित्रातून घ्यावी.
शिवाजीराजे प्रयत्नवादी होते;
निराशावादी नव्हते.
शिवचरित्रातून आज आपण
प्रयत्नवाद शिकला पाहिजे.
शिवाजीमहाराज
निर्व्यसनी होते. त्यांचे सर्व
मावळेही (सैनिक) निर्व्यसनी होते.
त्यामुळेच शिवाजीराजे यशस्वी झाले.
व्यसनाधीन लोक कधीच
क्रांती करू शकत नाहीत.
शिवरायांच्या जीवनचरित्रातून
निर्व्यसनीपणा तरुणांनी शिकावा.
शिवाजीराजे चारित्र्यसंपन्न होते.
“शत्रूंच्या स्त्रियांचादेखील त्यांनी आई-
बहिणीप्रमाणे आदर केला. “”ज्याला यश पाहिजे
त्याने स्त्रीअभिलाषा धरू नये.
स्त्री ही मराठ्यांच्या
देव्हाऱ्यातील देवता आहे!” असे उद्गार
शिवरायांनी वेळोवेळी काढले.
हिरकणीच्या निर्भीडपणाचा,
साहसाचा आणि मातृप्रेमाचा सन्मान
करताना शिवाजीमहाराज म्हणाले होते, “”ताई,
सर्व संकटांवर मात करून बाळाच्या ओढीने
घरी जाणारी तुमच्यासारखी
निर्भीड आई जोपर्यंत स्वराज्यात आहे, तोपर्यंत
ते कोणालाही जिंकता येणार नाही.”
आपली आई राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचा प्रत्येक
शब्द शिरसावंद्य मानला. आज आपण २१
व्या शतकाची भाषा बोलतो. खरेच, आज
स्त्री स्वतंत्र आणि सुरक्षित आहे?
एत्तद्देशीयांचे, जनमानसाचे राज्य
शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे,
प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारणारे
असंख्य मावळे बहुजनसमाजातून पुढे आले, कारण
शिवाजीमहाराज समतावादी होते.
शिवरायांचे राज्य रयतेचे, गरिबांचे, एत्तद्देशीयांचे,
जनमानसाचे राज्य होते.
शिवरायांनी कधी भेदाभेद
केला नाही. त्यामुळेच वीर
बाजी पासलकर, कान्होजी जेधे,
येसाजी कंक, कृष्णाजी बांदल,
कावजी कोंढाळकर, जिवाजी महाले,
शिवाजी काशीद,
तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे,
बाजीप्रभू देशपांडे, शेलारमामा,
बहिर्जी नाईक, हिरोजी भोसले,
मदारी मेहतर, सिद्दी इब्राहिम
इत्यादी नरवीर
शिवरायांसाठी पुढे आले. आज सर्वत्र अविश्वासाचे
सावट आहे. एकमेकांबद्दल कमालीचे गैरसमज
आहेत. अशा काळात शिवरायांची निष्ठावान
फळी कशी असेल?
शिवरायांच्याकडे आप-पर भाव नव्हता. नागनाथ
महाराला महाराजांनी पाटील केले.
रामोशी समाजातील
बहिर्जीला गुप्तहेर खात्याचे प्रमुख केले.
हंबीरराव मोहिते यांना सरसेनापती केले.
जिवाजी महाले या नाभिकाला अंगरक्षक केले.
माळी, धनगर, मातंग, महार, कोळी,
आग्री, शेणवी, मुसलमान
या सर्वांना शिवरायांनी हक्क-अधिकार दिले. आज
जातीचे, धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे राजकारण झाले
आहे. अशा काळात शिवरायांच्या चरित्रातून “समता’
शिकावी.
शिवाजी महाराज निःस्वार्थी होते.
“”एखाद्या गावच्या पाणवठ्यावरचे
पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका, अन्यथा रयत
म्हणेल, की मुघलच बरे.
संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे
विझवून झोपा अन्यथा एखादा उंदीर
पेटती वात तोंडात धरून धावत सुटेल
आणि ती वात कडब्याच्या गंजीला लागून
गंजी जळून खाक होईल, मग पावसाळ्यात
जनावरांना चारा मिळणार नाही. तेलवातीचे
दिवे विझवून झोपा,”
अशी शिवरायांनी प्रजेची
काळजी घेतली.
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालादेखील
हात लावू नका, अशा सूचना शिवरायांनी दिल्या. आज
मात्र शेतकऱ्यांच्या भाजीचे देठच काय
“शेतकरीच’ जिवंत ठेवायचा नाही, असे
क्रूर राजकारण शिजत आहे.

पण शिवरायांच्या वेळेस अस नव्हत.
शिवरायांनी शेतकऱ्यांना बी-
बियाण्यांचा पुरवठा केला. ओसाड
जमिनी ओलिताखाली आणल्या.
वतनदारी-मिरासदारी बंद
केली. पाणवठे, धरणे, तलाव बांधले.
दुष्काळग्रस्तांना मदत केली.
छत्रपती शिवाजी महाराजांना जगातील सर्वोत्तम प्रशासक का म्हंटले जाते?
कारण शिवरायांच्या काळात कोणालाही शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याचे उदाहरण सापडत नाही.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर
शिवरायांचे हे कृषिधोरण अवलंबावे लागेल.
अफजलखान आल्यानंतर शिवाजीमहाराज
काही अनुष्ठानाला बसले नाहीत
किंवा वारीला, कुंभमेळ्याला किंवा नारायण
नागबळी करायला गेले नाहीत, तर “यश
मिळविण्यासाठी हातात तलवार
घ्यावी लागते, रणांगण गाजवावे लागते, चातुर्य
पणाला लावावे लागते,’ हे महाराजांनी ओळखले होते.
शिवरायांनी एकाही किल्ल्याचा सत्यनारायण किंवा वास्तुशांती केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध मोहिमेच्या प्रसंगी मुहूर्त पाहिला नाही.

शिवरायांकडून आज वैज्ञानिक दृष्टिकोन शिकावा.
शिवाजीराजांची लढाई आदिलशहा, मुघल,
सिद्दी, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध
होती; पण ती राजकीय
लढाई होती. धार्मिक लढाई नव्हती.
याउलट शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के सैन्य मुस्लिमांचे होते.
त्यांच्या २७ अंगरक्षकांपैकी १० अंगरक्षक
मुस्लिम होते. त्यांचे पहिले चित्र रेखाटणारा मीर
महंमद हा मुस्लिमच होता. आरमारदलाचे प्रमुख दर्या सारंग
व दौलतखान हे मुस्लिमच होते. असे असंख्य मुस्लिम शिवरायांकडे होते.
शिवरायांनी पर धर्माचा नेहमी आदरच केला आहे. प्रत्येकाला आपला धर्म आचरण्याचा आधिकार दिला होता.
म्हणजे शिवाजीमहाराज
धर्मनिरपेक्ष म्हणजेच समता, मानवतावादी होते.
शिवचरित्रातून मानवतावाद शिकता येतो.
शिवाजीराजांचे सहा भाषांवर प्रभुत्व होते.
जगाच्या स्पर्धेत टिकावयाचे असेल तर बहुभाषक असावे,
ही प्रेरणा शिवचरित्रातून मिळते.
कोणतीही अनुकूलता नसताना
शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात
करून स्वराज्य निर्माण केले.
शिवरायांनी साडेतीनशे
वर्षांपूर्वी गाव सोडले. त्यामुळेच ते कोकण,
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा,
जिंजी जिंकू शकले. रेल्वे, विमान, हेलिकॉप्टर,
मोबाईल, इंटरनेट, फॅक्स, ध्वनिक्षेपक
इत्यादी अत्याधुनिक साधने
नसताना शिवरायांनी अशक्य कार्य शक्य केले.
शिवाजीराजांनी झाडांचे रक्षण करण्याचे
आवाहन केले. “झाडे सर्वथा न तोडावी. लाकूड-
फाटा हवा असेल तर जीर्ण झाड तोडा; पण
त्या ठिकाणी नवीन झाड लावा.
विनामोबदला शेतकऱ्यांकडून काही घेऊ नका.
सागाची, आंब्याची,
फळांची झाडे न तोडावीत,’ असे
आवाहन शिवरायांनी केले होते. आज पर्यावरण
धोक्यात आले आहे. जागतिक तापमानवाढ
हा जगापुढचा गंभीर प्रश्न आहे.
सजीवसृष्टीचे म्हणजेच पर्यावरणाचे
रक्षण करावयाचे असेल तर
शिवरायांच्या पर्यावरणदृष्टीची
अंमलबजावणी करावी लागेल.
शिवाजी महाराज आज येणार नाहीत.
आज आले तरी आपल्या हाती ढाल-
तलवार देणार नाहीत, कारण ढाल-
तलवारीची लढाई कालबाह्य
झाली आहे. इथून पुढचे युद्ध ज्ञानाचे, विचारांचे,
संगणक, माहिती तंत्रज्ञानाचे आहे.
शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन आपण गाव सोडून न्यायपालिकागड,
प्रशासनगड, चित्रपटगड, साहित्यगड, सांस्कृतिकगड,
दूरदर्शनगड, शिक्षणगड, धर्मगड, कलावाङ्मयगड जिंकले
पाहिजेत

संग्रहित….

नित

शिवप्रेमी गडयात्री ट्रेक समूह नियम

🚩 सस्नेह जय शिवराय 🚩
⛳ शिवप्रेमी गडयात्री ⛳
ट्रेक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आनंदसह माहितीचा स्रोत आहे, धकाधकीच्या जीवनात निसर्गाशी नाते जोडणारा एक उत्तम दुवा आहे, कट्ट्याच्या निमित्ताने हा दुवा जपता येतो, गिर्यारोहकांचे जग खरतर चार भिंतीबाहेरचे. खुल्या आकाशात मुक्तपणे विहरणा-या पक्ष्याप्रमाणेच तो डोंगरात, गड किल्ल्यांवर, जंगले नद्या ओलांडीत स्वच्छंद भटकत असतो.     चौकटीतल्या आयुष्यात तो कधीच बंदिस्त नसतो. पण ही भटकंती सुरू असते ती मात्र निसर्गाचा मान राखीत, त्याचे अलिखित नियम पाळीत, गिर्यारोहणातील सुरक्षेचे मूलभूत तत्व अंगी बाणवित. त्यामुळेच या विस्तीर्ण अवकाशात विहरणा-या सर्वच डोंगरवेड्यांना कोठे तरी एकत्र आणणे गरजेचे होते. एकत्र येऊन अनुभवांची देवाण-घेवाण करावी, नवनव्या गोष्टींची माहिती घ्यावी, येणा-या अडचणींवर उपाय शोधावेत यासाठी एक हा समूह निर्माण केला आहे. शिवप्रेमी गड यात्री…
      ट्रेकिंगला जाताना काही नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत.
* प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत.
* मोठ्या आवाजात बोलू नये.
* चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत.
* बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये.
* कुणीही चुकीचं वर्तन करू नये.
* टीम लिडरने दिलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत करणे.
* ट्रेकला जाताना व्यसन करू नये.(मद्यपान,अल्कोहोल,ई.) नाहीच राहवत असेल तर येऊच नये.
* ट्रेकचे निर्धारीत मानचिन्ह असलेल्या कुठल्याही वस्तू ,कपडे शक्यतो ट्रेक व्यतिरिक्त कुठेच वापरू नयेत
* ट्रेकिंगला म्हणून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्या सॅकमध्ये फर्स्ट एड बॉक्स (यामध्ये तुम्हाला लागणारी औषधे असावीत), खाण्याचे कोरडे साहित्य (चिवडा, लाडू, ठेपले थोडक्यात ज्या वस्तू टिकू शकतील असे.), प्लॅस्टिक बॅग्ज, साखर, मीठ, छोटी बॅटरी,त्यासाठी आणि कॅमेरा सोबत नेणार असाल तर त्यासाठी लागणारे सेल, पाण्याच्या दोन बाटल्या आणि सर्वात महत्त्वाचं एक कपडय़ाचा जोड,स्लिपर आणि रोप. या सर्व गोष्टी एक प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये व्यवस्थित रॅप करून सॅकमध्ये असावेत. अथवा ज्या समूहाबरोबर आपण जाणार असाल त्यांनी आवश्यक ती साधने, उपकरणे सोबत घेतली आहेत ना याची खातरजमा करून घ्यावी.
* ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे जाताना रुळलेल्या वाटेवरूनच शक्यतोवर जावे. पावसाळ्यात नवीन मार्ग शोधण्याचे साहस करू नये.
* ट्रेकिंगला जाताना ट्रेकिंग पँट, आणि पूर्ण बाहय़ाचा शर्ट घाला. मुलींनीही कॉटनचे कपडे न घालता ओले झाल्यानंतर पटकन वाळू शकतील, असे कपडेच घालावेत. पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात. त्यामुळे पायात चांगल्या प्रतीचे सॉक्स आणि ट्रेकिंग शूजच घाला. दागिने घालणे टाळा.
* तुमच्याकडे त्या ठिकाणी चालणारया नेटवर्कचा मोबाईल अवश्य जवळ असणे गरजेचे आहे. ट्रेकला जाण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे तसेच त्यांचा नंबरही सोबत ठेवावा. ट्रेक दरम्यान एखादी अडचण निर्माण झाली तर लगेचच त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
* धबधब्याच्या किंवा एखाद्या नदीच्या पात्रात डुंबायला जाता तेव्हा पाण्याचा अंदाज खूपच महत्त्वाचा असतो. तुम्हांला जर पोहोता येत नसेल तर खोल पाण्यात जाणे टाळा. पाण्यात गेल्यावर वेळेचे भान रहात नाही. पावसाळ्यात नदीच्या पाण्याला प्रचंड ओढ असल्याने पात्रात खोलवर जाणे टाळा. तुम्ही जिथे आहात तिथे पाऊस नसेल पण लांबवर पडणा-या पावसामुळे पाण्याची पातळी कोणत्याही क्षणी वाढ होऊ शकते.
* उंचावरून कोसळणारा धबधबा प्रत्येकालाच आकर्षति करत असतो. पण या धबधब्यांमधून लहान मोठे-दगड येण्याची शक्यता असते. वरून येणारा लहानशा दगडामुळेही इजा होण्याची शक्यता असल्याने अशा धबधब्यांखाली खाली उभे राहणे टाळा.
* पावसाळ्यात धबधब्यांमध्ये रॅपिलग करताना यामध्ये धोका असतो हे लक्षात असू द्या. प्रत्येक रॅपिलग झाल्यावर दोर चेक करायलाच हवा. रॅपिलग करणा-याला हेल्मेट घालणे बंधनकारक असते तो नियम काटेकोरपणे पाळावा.
* निसर्गाचे सौंदर्य कॅम-यामध्ये टिपत असताना वेळेचेही भान असू द्या. एखाद्या अवघड जागी उभे राहून फोटो काढणे, दंगामस्ती करणे टाळावे,तसे करणा-यांना त्यापासून प्रवृत्त करावे.
* ज्या ठिकाणी जाणार आहात तिथल्या स्थानिक गावक-यांची कधीही मदत लागू शकते हे ध्यानात घेऊन त्यांच्याशी सौजन्याने वागा. जर गावाबाहेर किल्ल्यावर तुम्ही जाणार असाल आणि तिथे जर तुम्ही वास्तव्य करणार असाल तेव्हा गावातील काही लोकांचे दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक, तिथल्या पोलिस ठाण्याचा क्रमांक जवळ ठेवा. शक्य झाल्यास तिथल्या एखाद्या गावकऱ्याला तुमच्यासोबत न्या.
* तुमच्या ट्रेकिंगमध्ये एका रात्रीचा मुक्काम असेल तर सोबत कॅरीमॅट, ओडोमॉस, शक्य असेल तर स्लििपग बॅग बाळगा. तसेच रात्रीचा स्वयंपाक झाल्यावर त्या ठिकाणची स्वच्छता अवश्य ठेवा.
* ट्रेकिंगच्या दरम्यान तुमच्याकडे असलेला कचरा, खाद्यपदार्थाची वेष्टणे, फळांची साले, थंड पेयांचे डबे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागद,निरुपयोगी वस्तू इकडेतिकडे फेकू नका. गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखा.
* ट्रेक संपल्यानंतर ओले झालेले बूट, सॉक्स काढून ते सोबत असलेल्या पेपरमध्ये गुंडाळून ठेवावेत आणि पाय कोरडे करून स्लिपर घालाव्यात.
ट्रेकिंगला निघण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली क्षमता ओळखूनच ट्रेकिंगला/फिरायला जाण्याचे ठिकाण निवडावे.
* तुम्ही पहिल्यांदाच ट्रेकिंगला जाणार असाल तर आधी एका दिवसाच्याच ट्रेकला जा आणि अनुभवी व्यक्तीं/ ग्रुप्स सोबतच जा. जर मित्रमंडळींच्या ग्रुपबरोबर जाणार असाल तर गावातील स्थानिक व्यक्तीला वाटाडय़ा म्हणून सोबत घ्या.
* ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात तिथले मार्गाची माहिती असावी, सोबत त्या भागाचे नकाशे असावेत. त्यामुळे परतीच्या मार्गात जर काही अडचण आली तर पर्यायी रस्ता वापरता येऊ शकतो.
संग्रहित…
धन्यवाद….
संकलन :- नितेश पाटील (पालघर,धनसार)
मोबाईल नं. ०९६३७१३८०३१
email :- nitesh715@gmail.com

नित

सुख दुःखे

सुख-दुःखे

मीच ठेवीले भक्तिरूप माझे
प्रार्थनेतून एकाच ठायी स्थित
सुखदुःख येती जे माझीया कर्मे
तैसे ते बळ देत राही मज नित्य….
         माणूस म्हंटला कि सुख-दुःखे आलीच. त्याशिवाय त्याच जीवनच नाही.पण माणूस त्याच्या अधीन जास्त जात असल्यामुळे, आणि नात्यांच्या बंधनात वाहवत जात असल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या जगण्यावर होत असतो. पण एक लक्षात घेतलं तर कळेल कि सुखात सारेच सहभागी असतात. पण दुःखात मात्र मोजकेच असतात. म्हणजेच गंध हवा असतो..!! पण आवडीचा असेल तर… अशी गत असते…
         तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदु:खे आहेत ती ऋतूप्रमाणे आहेत. ती सुख-दु:खे आपल्या इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती खवळून, चवताळून, अती उत्साहित न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. म्हणजेच मर्यादेत राहिलं पाहिजे. ज्याने मर्यादा पाळली त्याचा समाजात सन्मान होत असतो हा इतिहास आहे.
         विश्व म्हणजे काय..?? ते कोणी निर्मीले..?? या प्रश्नांची उत्तर निःसंशय भिन्न आढळतील. याचाच अर्थ माणसांचे विचार भिन्न असतात. आणि त्यामुळेच सुखदुःखाची परिभाषाही वेगवेगळी असते. त्यानुसारच माणूस झगडत असतो. स्वतःजवळ असलेल्या, मिळवलेल्या ज्ञानाने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो.
          काही वेळेस त्याला आपल्या तत्वानुसार मित्र, नातेवाईक किंव्हा इतर कुणाशीही झगडावे लागले तरी त्याने त्याच्या नियतकर्मापासून ढळू नये. शेवटी हे विश्व मायाजाल आहे. ज्ञान एका विशिष्ट स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधीविधानांचे पालन करणे आवश्यक आहे. काही झालं तरी प्रत्येकाला बंधनं हि असतातच. त्याचे प्रकार वेगवेगळे असतील तो भाग वेगळा.
         मनासारखे कुणालाच जगता येत नसते. परिस्तिथीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म. ईश्वर कुठे असेल तर तो आपल्या भक्तीने, प्रार्थनेने, आचरणाने एका जागी आपणच स्तिथ केलेली अदृश्य शक्ती असते. आता ते आचरण ती भक्ती आणि प्रार्थना कोणी कुठे कशाप्रकारे साठवलंय अथवा नाही हे ज्याचं त्याला अवगत असतं. तो त्या जागी पोहचल्यावर निश्चितच तुम्हाला संघर्ष करण्याचं बळ ती देत असते. तसेच समस्या नष्ट करणारे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. म्हणूनच केवळ ज्ञान व भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वत:ला मुक्त करू शकतो ….वयक्तिक मत…

…….नितेश ज्ञानेश्वर पाटील
पालघर, धनसार
९६३७१३८०३१

नित

गुडीपाडवा धनसार एक गाव-एक उत्सव

सस्नेह जय शिवराय….
        ज्या परंपरेतून, संस्कृतीतून आपल्याला जगण्याचं सामर्थ्य मिळत असतं ती जागृत ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हिंदू संस्कृती आणि परंपरा या अनाधिकाळापासून चालत आलेल्या आहेत. त्यांना ऐतिहासिक परंपरा आहेत. सध्या वाढती असुरक्षितता आणि सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा यामुळे माणुस स्वतःमध्ये गुंतला आहे. पण तो आपल्या संस्कृती, परंपरेशी आजही वेगळा झालेला नाही. आज समाजात लोकांचा सण, उत्सवांकडे कल वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही सण, उत्सवात सहभाग घेणाऱ्यांची संख्या कमालीची वाढतेय. 
        पण दुसरी बाजू अशीही आहे कि समाजात फोफावलेल्या राजकारणामुळे परिणामी उद्भवलेल्या वादामुळे सण, उत्सवही त्या त्या पक्षाचे होऊन राहिलेत. परिणामी ठराविक माणसं सोडली तर दर्शनाव्यतिरिक्त तिथे कुणीही फिरकत नाही. आणि सुज्ञ माणसेही फक्त शिष्टाचार म्हणून त्यात आखडता सहभाग घेतात. सण, उत्सव साजरे जरी होत असले तरी पाहिजे तेवढा प्रतिसाद म्हणजे सर्व समावेशक असा मिळत नाही. हि वास्तुस्तिथी आहे.
       आमच्या गावातील हीच परिस्तिथी बदलण्यासाठी गावातील नवयुवक आणि नवयुवतींनी पुढाकार घेऊन “गुडीपाडवा धनसार एक गाव-एक उत्सव” हि संकल्पना साकार करण्याचे ठरवले. आणि सर्व समावेशक प्रतिसाद मिळवा यासाठी कसोशीने प्रयत्न करू लागले. उत्सव हे मनाला आनंद, उभारी देणारे असतात. त्यामुळे ताणतणावाच्या निरसनासाठी मनस्वास्थासाठी अशा उत्सवांची अधिक गरज वाटू लागली आहे. पण ते निपक्षी आणि पारदर्शक असावेत.
            मराठी महिन्यांतील चैत्र महिन्यातला पहिला दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा. नव वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून सुरू होणाऱ्या नववर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे. असं सांगतात की जेव्हा ब्रह्मदेवाने ही सकल सृष्टी निर्माण केली त्या कार्यारंभाचा हा दिवस म्हणून गुढी उभारली जाते. तसेच प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आले तोच हा दिवस. त्या दिवशी सर्व अयोध्यावासीयांनी गुढ्या, तोरणं उभारून श्रीरामांच स्वागत केल तो हा दिवस.
        हिंदू महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्‍या प्रदक्षणेवर आधारले गेले आहेत. त्यामुळे ही चंद्र कालगणना आहे. ख्रिस्ती महिने किंवा इंग्रजी महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्‍या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. त्यामुळे ती सौर कालगणना आहे. हा दोन्ही कालगणनेत महत्वाचा फरक आहे. सहा ऋतू आणि बारा महिने त्यातील वसंत ऋतूच्या महिन्यातील पहिला दिवस गुढीपाडवा.
           वसंतातील चैत्र महिन्यात जर आपण सभोवतालच्या सृष्टीचं अवलोकन केलं तर असं लक्षात येत की शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळती, निष्पर्ण झालेले वृक्ष हे चैत्राच्या नव पालवीने फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल लागताच कोकीळ आपल्या कंठातून सु-स्वराने गात असते. निसर्गातल्या परीवर्तनाचे, नव चैतन्याचे, नव सृष्टीचे स्वागत दारी गुढी लावून करायचं हा हि त्या मागचा एक उद्देश आहे.
          एक गाव एक उत्सव हि संकल्पना अतिशय सुंदर आणि साजेशी पण ती प्रत्यक्षात उतरवणं तेवढच शर्थीच काम. कारण त्यासाठी त्या उत्सवात संपूर्ण गावातील ग्रामास्थांनचा सहभाग असनं अपेक्षित. आणि आताच्या राजकारणमय वातावरणामध्ये ते करणे म्हणजे ..? कारण दूषित वातावरणात श्वास गुदमरत असतो. त्यात संचार करणं सुज्ञ माणुस नेहमी टाळत असतो. आणि हल्ली ती अवकळा साऱ्याच ठिकाणी पसरली आहे. पूर्वी आमच गावं असं नव्हत. सर्व गुण्यागोविंदाने उत्सव साजरे करायचे पण आता गाव एक आणि दुखणं अनेक अशी गत झाली आहे . कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा मीपणा नकळत का होईना येऊ नये. शेवटी व्यक्तिमत्वाचा प्रभाव चांगला अथवा वाईट हा जनमानसात पडतच असतो. परिणामी दुरावा निर्माण होतो. लोकांनीही नजरेआड न करता पारदर्शकता जागृत करायला हवी. पाठीमागे बोलून कोणत्याही गोष्टी साध्य होत नसतात.
       आणि आम्ही साऱ्यांनीच ठरवलं होतं पारदर्शकतेला प्रथम प्राधान्य. वारंवार चर्चासत्र घेऊन संपर्कात राहायचं.  गावातील तरुण पिढीनी ते सार्थ करण्याचं धाडस केलं. कारण गाव कितीही भावनिक दृष्ट्या दूषित झालं तरीही आमच्याच नव्हे तर प्रत्येक गावामध्ये एक साम्य असते ते म्हणजे गावातील बहुतांशी ग्रामस्थ हे गावातील राजकारणाला म्हणा, त्यामुळे निर्माण झालेल्या द्वेषाला म्हणा, परस्परांतील वादाला म्हणा, कंटाळलेले असतात. त्यांना एका निपक्षीय वर्गाची गरज असते, परदर्शकतेची गरज असते. आणि दुसरं म्हणाल तर आजच्या नवीन पिढीला आपली मराठी संस्कृतीचं दर्शन घडवून देनं, आपली मराठी संस्कृती टिकवणं, गावाची एकात्मता वाढीस लावणे ह्यासाठी हे पाऊल मोलाचं ठरणार होतं.
        आम्ही जसजशी गावातील ग्रामस्थांना आळीआळीमध्ये जाऊन हि संकल्पना सांगू लागलो तसतसा समोरून उत्स्फूर्त प्रतिसाद येऊ लागला. आम्ही काही नियमावली तयार केली होती ती हि आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू लागलो. अर्थातच भव्य शोभायात्रा काढायची म्हणजे खर्चिक बाब आलीच कि ! त्यातही सर्व ग्रामस्थांचा समावेश असावा , कुणीही काश्याप्रकारेही मदत करू शकणार होता. पैशांमार्फात, वस्तुंमार्फत पण तिथे एक अट होती कि कुणीही कितीही मोठी मदत ह्या शोभा यात्रेसाठी केली तरीही त्या व्यक्तीच नाव कुठेही घेतलं जाणार नाही. त्याचा “ग्रामस्थ धनसार” म्हणूनच उल्लेख केला जाईल. हा उत्सव साजरा करताना कुठचीही कमिटी नेमली जाणार नाही. जमा झालेली ऐवज आणि त्याचा जमाखर्च कार्यक्रम संपल्यानंतर तात्काळ घेऊन शिल्लक रकमेची विल्लेवाट लावण्यात येईल. ह्या अटी आम्ही ग्रामस्थांची सभा घेऊन सर्वसहमतीने मान्य केल्या. आता हा उत्सव आमचा नव्हता तर  गावातील सर्व ग्रामस्थांचा होता आणि त्याच्या शीर्षकावर शिक्कामोर्तब झालं.

 || श्री भवानी माता प्रसन्न ||
धनसार एक गाव – एक उत्सव
आयोजक :- ग्रामस्थ धनसार

        युवा पिढीने नव्हे ग्रामस्थ धनासर ने आयोजित केलेल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी, नवीन पिढीच्या संस्कृती दर्शनासाठी , आपली संस्कृती जपण्यासाठी, गावातील एकात्मतेसाठी गुढीपाडवा भव्य शोभायात्रेने करण्याचे निच्छित झाले . आणि त्यामध्ये पारंपारिक पोशाख, लेझीम, पिरॅमिडचाही आवर्जून समावेश होता. त्याचा सराव एक महिना आधीपासून रोज सायंकाळी ६.०० वाजेपासून गावातील भवानी मातेच्या मंदिरात होऊ लागला.
         नववर्षाच्या आदल्या दिवशीच्या रात्री गावातील ग्रामस्थ उत्साहाने सुशोभिकरणासाठी मग्न झाले होते. विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सर्व रस्ते रांगोळीने सुशोभीत करण्यात आले. जागोजागी कमानी उभारल्या गेल्या. रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताक्यांचा साज चढवला गेला. आणि पाहता पाहता तो हि दिवस उजाडला ……चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९३६ दि. ३१ मार्च २०१४ नुतन वर्षारंभ, नवीन पहाट, नवीन सकाळ…
          सकाळी  ५.५० वाजता ग्रामस्थ मंदिरात पारंपारीक वस्त्र परीधान करून जमा होऊ लागले. ढोल, टाशा, लेझीम, भगवे पेठे, भगवे झेंडे आणि सारं वातावरण प्रफुल्लीत, उत्साही, आनंदमय, भगवामय होऊन गेलं. मंदिरात गुढी उभारून तिचं ब्राम्हणाच्या हस्ते विधिवत पूजन करून शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रेत सहभागी होणारी बैलगाडीही सज्ज झाली होती. तिलाही संस्कृतीचा साज चढविला होता.आणि तिच्यावर साकारलेल्या चलचित्रात अभंगात तल्लीन झालेले संत तुकाराम हे खास आकर्षण मोहून टाकणारं होतं. पाहता पाहता गावातील बहुतांशी ग्रामस्थांनी ह्या शोभायात्रेची शोभा वाडवली .आणि शिस्तबद्ध पद्धतीने शोभायात्रा पूर्ण गावामध्ये मोठ्या उत्साहात फिरवन्यात आली. ढोल टाश्यांच्या गजरात (ढोल,टाशा वाजवणारे गावातीलच युवक होते) भवानी मातेकी जय, छत्रपती शिवाजी महाराज कि जय च्या गजरात आसमंत दणाणून गेला. त्यात विशेषकरून महिलांचा पारंपारिक पेहराव.
          लेझीम नृत्यातून शिवसृष्टी साकारण्यात आली होती. त्यात शिवरायांच्या जीवनातील विविध पराक्रमाचे दृश्य दाखवण्यात आले होते. खानाचा वध, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे छाटली असे बरेच प्रसंग. सरते शेवटी शोभायात्रा पुन्हा मंदिरात येऊन ती संपली असं जाहीर करण्यात आलं. तदनंतर त्याच पारंपरिक पेहरावात आम्ही एका दुचाकीवर एक युवक आणि एक युवती हातात भगवा ध्वज घेऊन सव्वीस जन धनसारहून पालघर, शिरगाव आणि पुन्हा धनसार अशी दुचाकीचीवरची मिरवणूक पार पाडली. खरोखरच तो उत्साह, जल्लोष भन्नाटच… नववर्षाचे स्वागत करावे तर असे…
       सायंकाळी मंदिरात सत्यनारायणाची पूजा संपन्न करून कार्यक्रमाचा शेवट केला गेला.  ह्यावरून माझ्या मते  एकच गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे आपण जर निस्वार्थी मनाने कोणताही कार्य करण्यास हाती घेतलं तर परमेश्वरा बरोबरच आपल्या सानिध्यातील जनसमुदाय आपाल्या बरोबर राहत असतो. दरवर्षी त्याच जल्लोषात, उत्साहात आम्ही हा सण साजरा करतो आणि या पुढेही करत राहणार. आणि विशेष म्हणजे स्थानिक वृत्तपत्रांनीही या कार्यक्रमाची दखल घेतली होती.
कुठलंही कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ असतात असं म्हणतात पण त्यासाठी विश्वास लागतो. आपण जे भांडवल आपल्या श्रद्धेतून, आचरणातून अदृश्य रुपात जमा करत असतो ती अदृश्य शक्ती आपले कार्य सिद्धीस नेण्यास प्रत्यक्षात सदैव आपल्या सोबत असते. आणि हीच ईश्वरी कृपा असावी असा माझा दृढ विश्वास आहे. हा सोहळाही समस्त ग्रामस्थांच्या त्याच शक्तीने संपन्न झाला. आणि परिणाम स्वरूप गावातील एकात्मता वाढीस लागण्यास सुरवात झाली. गावातील एकमेकांना वरचेवर ओळखणारे ग्रामस्थ यानिमित्ताने गावातील कुठल्याही कार्यक्रमात एकत्र दिसू लागले. गावातील क्रिडा क्षेत्रात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाणारे संघ त्याव्यतिरीक्त एक गाव एक संघ धनसार हा नवीन संघ उदयास आला आणि विशेष म्हणजे जिथे कुठे खेळ खेळला जाणार असेल तिथे पन्नासच्या वर गावातील मुलांची संख्या असते. कुठल्याही कार्यात आवर्जून सारे हजेरी लावतात, मदत करतात. हा बदल निश्चितच लक्षणीय आहे. मलातरी वाटतं गावाची एकात्मता वाढीस लावण्यासाठी “एक गाव-एक उत्सव”हा सर्वोत्तम पर्याय आहे.

एक गाव एक ऊत्सव
जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मीतेचा…
सण ऊत्साहाचा…
हिंदु संस्कृतीचा…
मराठी मनाचा…

नितेश ज्ञानेश्वर पाटील
पालघर, धनसार
०९६३७१३८०३१

छत्रपती शिवराय मला काय कळलेत ?

नमस्कार
सस्नेह जय शिवराय
          या धावपळीच्या जगात ना कुणाला जगायला वेळ आहे ना कुणाला उरायला..!! जीवघेण्या स्पर्धेपाई आयुष्य गमावून बसलेत सारे. माणसातला माणूस विरळ झालाय. जो तो आपल्या दुनीयेत रमला आहे, संघर्ष करत आहे.
        पण जगायचा निखळ आनंद घ्यायचा असेल तर माणसाने सह्याद्रीच्या पर्वतरागांचा कणखरपणा, सौम्यपणा, ती झुंज, तो एकांत, त्यात बहरुन जाणं आणि निव्वळ सह्याद्रीतच नव्हे तर महाराष्ट्रात, देशभरात शिवछत्रपतींनी, निष्ठावंत मावळ्यांनी जे शौर्य गाजवले जे अजूनही जिवंत आहे ते अनुभवायला हवं. आपल्याला निसर्ग अगदी भरभरून देत असतो. त्या निसर्गाची बीजं सह्याद्रीच्या पठारात खोलवर रोवलेली आहेत. आणि सह्याद्रीचा कल्पवृक्ष आजही तिथे खंबीरपणे उभा आहे. आजही तो त्या पराक्रमाची साक्ष देत आहे.
         त्या सह्याद्रीवर अधिराज्य गाजवणारे “श्री शिवछत्रपती शिवराय” आणि स्वराज्यासाठी मरणास तत्पर असलेले “निष्ठावंत मावळे”. बाकी माझी गणती कशातही नाही.
        आज माणूस म्हणवून घेण्याचीही लाज वाटावी अशी काही दुष्कृत्ये घडतात. आणि मी कानाडोळा करतो. जोपर्यंत माझ्या वाट्याला ती ‘झळ’ येत नाही तोपर्यंत मी ती मुकाट्याने बघत असतो.  फार तर हळहळत असतो. काही वेळेस इच्छा असूनही काही करता येत नाही तो भाग वेगळा. हि स्वराज्य पुसट झाल्याची चिन्हे आहेत. पण आज स्वराज्य, स्वातंत्र्य मिळूनही, ही परीस्तीथी का निर्माण व्हावी हा चिंतनाचा विषय आहे. हे स्वतंत्र नव्हे. आजही सामान्य जनता वेठीस धरली जातेय. दडपणाखाली जगतेय. याला जबाबदार कोण..?
       स्वराज्य पुसट झाले तरी व्यक्तिमत्व पुसट होत नाहीत. महाराज्यांच्या कीर्तीचे सारेच गुणगान करतात आणि कारावयासही हवे. पण त्या किर्तिमागचा संघर्ष आपण बाजूला सारतो का..? नसेलही पण त्या संघर्षातून मी काय धडे घेतो हा हि महत्वाचा प्रश्न आहे. संघर्ष सारेच करतात हो..!!! पण तो स्वस्वार्थासाठी नसावा.
       शिवचरित्राची शिकवण नेभळट नक्कीच नाही. श्वास घेऊन माणूस जगतो त्या श्वासातला प्राणवायू “शिवराय” आहेत. तो दूषित होता कामा नये. शिवरायांचे चरीत्र काय आहे हे साऱ्याण्याच ठाऊक आहे. पण शिवचरित्रातून काही शिकायचं असेल तर तीन प्रश्न स्वतःला विचारायला हवेत…
१. आपण जन्माला का आलो..?
२. आपण करतो काय..??
३. आणि करायला पाहिजे काय…???
या तीन प्रश्नांची उत्तरं मला सापडली म्हणजे मला माणूस म्हणवून घेण्याचा आणि स्वतःला शिवभक्त म्हणवण्याचा अधिकार आपसूकच येईल.
       शेवटी दाखवणं,भासवणं वेगळं आणि आदर्श आत्मसात करून त्या प्रकारच आचरण करणं वेगळं. त्या तीन प्रश्नांच्या उत्तरातच माझं भवितव्य दडलेलं आहे हे एक निरंतर सत्य आहे.

            खीळ बसुनी म्यान व्हावे
                 नाही बोथट शौर्य तयांचे…
                     जगणे सोडून काय गातोस
                           घे निष्ठा नि आदर्श तयांचे….
……..नितेश पाटील
        ९६३७१३८०३१

नित

सानिध्य निसर्गाचे

भीमाशंकर – सानिध्य निसर्गाचे
गिर्यारोहण ( ट्रेक )
भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग म्हणजे ‘भीमाशंकर’. निसर्ग सौंदर्याने नटलेलं…सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले. निसर्गातील डोंगराच्या जाळ्यात लपलेले हे मंदिर पाहण्याचा योग आला त्या विषयी……
निसर्गाने नटलेल्या महाकाय अशा अरण्यातुन खास करुन पावसाळ्यात पदभ्रमण करीत जाणे हा वेगळाच अणुभव. चहुबाजुनी जर्द झाडांची दाटी, पक्षांचा तो सुमघुर आवाज, झाडांच्या पाणांचा सळसळनारा आवाज, झाडांवर पडनाऱ्या पावसाचा आवाज, मघुनच अदृष्य झऱ्यांचा आवाज. उत्सुकता होतीच आणि ठरलेही होते दोन दिवसांचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे शुक्रवार दि. २१.०८.२०१५ रात्री पालघर, धनसारहून आम्ही ५ जन आणि बाकी मुंबईहून अशा ४१जणाचां समुह तयार झाला.
आम्हाला छत्रपती शिवाजी टर्मिनल वरून रात्री १२.३० च्या शेवटच्या कर्जत लोकलने जायचे होते. आम्ही टाटकळत लोकलची वाट बघत होतो. तितक्यात एक २५शीतील नवतरुण जोडपं आमच्याजवळ येऊन ऊभं राहीलं आता माणसाचा स्वभाव कसा हे सांगायची गरज नाही. अन् मधेच एकजन बरळला कि एक आली तिही प्रोटक्शन घेऊन….!! तो त्या व्यक्तीचा दोष नाहीये. कस असतं ना आपण छान स्वयंपाक बनवला आणि त्यात जर मिठच नसेल तर त्या जेवनाला काही चव असेल का ? तुम्ही फक्त मिठ खाऊ शकत नाही, पण ते चवीसाठी हव असतं त्यातलाच हा प्रकार. मानसिकता तर स्तुत्य असेल तर असले प्रकार घडत नाहीत. असो…….लोकल येताच आम्ही लगबगीने बसलो लोकल चालु होताच गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि निघालो
विषेश म्हणजे आमच्यात ७ वर्षाची चिमुकली आर्या होती. मनात विचार आला ही ईवलासी चिमुकली कशी बरं चढनार ? हिच्या आईबाबानी का बरं आणलं असावं हिला ? मुसळधार पाऊस चालु होता. मनात शंका आली ३४४५ फुट उंच अशा पर्वतावर महाकाय अभयारण्यातुन पावसात कसं जाता येईल. पण समुहातील जुनेजानते फार खुष होते. कारण त्याना माहीत होतं भिमाशंकर पदभ्रमण करीत गाठायचा असेल तर पावसाशिवाय त्रासदायकच. चढताना मलाही तोच अणुभव आला.
मुंबई ते कर्जत आणि कर्जत हुन खांडस ४० किलोमीटर अंतर आहे. कर्जतला तुफान पाऊस चालू होता. आम्ही भिमाशंकरच्या पायथ्याशी खांडस गावात पोहचलो. तेव्हा पाऊस थांबला होता. सकाळ होईपर्यंत आम्ही विसाव्यासाठी मारुतीच्या मंदिरात थांबलो. हे मारुतीरावांच एक बरं आहे तुम्हाला क्वचीत असं गाव सापडेल जीथे ह्यांच मंदिर नसेल. सर्वांनी आपापली सोय करून माना टाकल्या. झोप येणं तितकं सोपं नव्हतं. कारण झोप लागते ना लागते तोच बेडकाच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला पण आवाजात भिन्नता होती. काही वेळाने कळलं कि हे आपल्यातलेच महाभाग आहेत ते घोरत होते सर्वांची टोन अलग अलग. आता ते नैसर्गिक आहे त्याला काय करणार. पण झोपमोड झाली हे मात्र खरं. सकाळच्या प्रहरी पाऊस मात्र पुन्हा नाचु लागला होता. काही वेळाने त्यानेही आटपतं घेतलं. आणि बाहेर पडलो तोच समोर धुक्यात आपला चेहरा लपवून ठेवलेला महाकाय पर्वत दृष्टीस पडला. हिरवा गालीछा अंथरलेला, पांढरया शुभ्र झरयानी मडलेला, ढगांच पांघरुन घेतलेला. भिमाशंकर पर्वत.
शरीर शुद्धी आणि चहाची चुस्की घेऊन निघण्याच्या तयारीत होतो. समोरच
निसर्गरम्य दृश्य, डोंगरावरून वाहणारे ते झरे. तितक्यात एकाने सेल्फी स्टिक काढली हल्ली ती एक फॅशनच झालय. एकाने तर त्याबाबतीत कळसच केला होता मृतदेहाला स्मशानात नेत असताना एका हातात मृतदेह एका हाताने सेल्फी काढून पाठवलेली. काय म्हणावं आता… आज माणुस आपलच सौंदर्य न्याहाळन्यात रमला आहे. माणुस सेल्फीच्या नादात सेल्फिश झाला आहे. असो तर हे भाई सकाळ सकाळ त्या सेल्फी स्टिक ने सेल्फी काडण्याच्या तयारीत आणि मोबाईल निसटला ना त्यातून..!!! मग काय फुटला डिस्प्ले. झालं दिवसाची सुरवात हि अशी …नंतर ७ च्या ठोक्याला आम्हची रिंगण बनवून ओळख परेड झाली. डोंगरयात्री समूहाचे जुने जानते ट्रेकर्स वृंदावन दादांनी पुरुषांचं प्रतिनिधित्व केलं आणि सुजा ताईनी महिलांचं. बाकी सारे होतेच.
आम्ही काहीजण अगदीच नवखे होते पण तसं मरगळलेल कुणी दिसलं नाही सर्वांचा उत्साह शिगेला होता. वर चढन्यास सुरवात केली आम्ही पालाघरकर मात्र वर चढतानाही आणि उतरतानाही रूट लीडर सोबत पुढेच होतो. खांडस गावातून पुलापर्यंत पोहोचण्यास १५-२० मिनिटे लागली. पुलाजवळ पोहोचाल्यावर उजवीकडे जो रस्ता जातो तो गणेश घाट नि आम्ही सरळ शिडी घाटाच्या रस्त्याने निघालो .शिडी घाटाच्या सुरुवातीस एक मोठी विहीर लागते तिथून उजविकडे पाहिले की सुंदर लोभनिय असा पदरगड़ दृस्टिस पडतो
            विहीर ओलांडली नि पावसाची रिपरिप थोडी वाढली . काही जण पावसाळी चिलखते घालून होते. मीही त्यांच्यातील एक. जुने ट्रैकर मात्र पावसाचा आनंद लुटत होते. थोडीशी चढण पार केल्यावर एक ओढा लागतो. जुलैला एवढा पाऊस नसून सुद्धाओढ्याला चांगलाच वेग होता . भीमाशंकर ट्रेकची हीच खासियत असावी. तिथे चहा व नास्त्याची सोय आहे. अंघोळ व नास्ता तिथेच करून पुढे निघणार होतो. एक वृद्ध म्हणता नाही येणार पण आम्हा सर्वांपेक्षा निच्छित मोठे(50वर्ष) होते ते त्या ओढयातुन दगडीतून वरखाली होत एखाद्या झाडाच्या ठोकळ्या प्रमाणे वाहत आले. आणि तोच प्रयोग एका 25शीतील तरुणाने केला त्याला जमल नाही. मलाही जमल नसतं. त्यांचा उत्साह पाहन्यासारखा होता. मी तर पाण्यात ही उतरलो नव्हतो मनात थोडी चलबिचल होतीच भिजलो थंडी वाजली तर चढणार कसं. ब्रेड बटर  जाम आणि चहा मस्तपैकी हाणला आणि निघालो. पुढे गेल्यावर मात्र भिजनं रुचकर वाटू लागलं.
            पदभ्रमण व गिरिभ्रमण करणाऱ्यांचा तर हा स्वर्गच आहे. या परिसरात तयार झालेल्या पाऊलवाटांनी फिरण्यातच खरी मजा आहे.
.शिडीच्या आधी रस्ता थोडा जबराटच( सिधी चडण  ) आहे म्हणा. पावसाने दडी मारल्यामुळे  ईथे पोहचता पोहचता दमछाक निघाली. अखेर पोहचलो शिडी घाटाच्या शिडीपाशी. तसा दीड फुट रुंदीचा जिनाच म्हणावा लागेल पण एका वेळी एकाच जन चडू शकत होता थोडी हरकत हि करत होती शिडी. पहिली शिडी चढल्यावर एक छोटासा विसावा देणारी जागा येतो . गुहा म्हणता येणार नाही परंतु छोटीशी जागा आहे विसाव्यासाठी. येथून पदर गडाचे लोभस दृश्य दिसते. एव्हाना आपण चांगल्याच उंचीवर आलेलो असतो नि आपणास खाली पाहण्याचा मोह होत असतो अशावेळी जरूर पाहावे पण खाली काही दिसत नव्हते. दिसले ते सगळे धुके..!! तर विसाव्याच्या जागेच्या उजव्या हाताला दुसरी शिडी आहे. हि शिडी त्याहीपेक्षा सांभाळूनच चढावी लागते. ती काही फिक्स नाहीये. हि शिडी चढून हुश्श म्हणतोय तो पर्यंत अशी चढाई येते जिथे दोरीने चढावे लागते. एक जन पुढे जाऊन रस्सी खाली टाकतो. रस्सी पकडून चढण्यात काय ती औरच मजा… हा आता रस्सीचा हात सुटला म्हणजे संपला खेळ. तो भाग वेगळा असो.
         पुढे  परत एक धवल फेसाळलेला उंचावरून भूमीशी संग करण्यासाठी आतुरलेला धबधबा ! तिथे मात्र भरभरून भिजलो  …. येथे एक उदास झाड दिसेते नि या झाडाच्या मागे धुक्यात पदरगड लपला असावा असे वाटते. इथल्या बहुतांशी झाडांना शेवाळ बाजलेल. ते धुके आणि पावसामुळे. आता पुढे एका मोठं ठिगळ ओलांडून जावं लागतं. ते करून हुश्श करेस्तोपर्यंत दुसरा एक अॅनाकोंडा सारखा आ वासून उभा असतो. याचे वैशिष्ट्य असे कि हा नागमोडी आहे …. चेष्टा वाटते ना जाऊन या नि मग मला सांगा. पहिला टप्पा पार केल्यावर आपणास दोन दगडाच्या मधुन वाकुन  उजव्या  बाजुला वळायचं असतं. पहिला ठिगळ तुलनेने सोपा आहे . परंतु दुसर्या ठिगळ च्या चढाई साठी दोन मोठे दगड आहेत. व या दगडावर प्रत्येकी एक असा माणूसच उभा राहू शकतो. खाली खोल दरी. तसेच याच्या उजव्या बाजूस धबधबा आहे. ही दोन ठिगळं  आपण उत्तम रित्या पार केलीत कि शिढी घाटाचा हत्ती गेला म्हणून समजा.
       पुढे साधी चढण आहे नि थोड्याच अंतरावर गणेश घाटातून येणारी वाट इथे मिळते. ईथे एक चहाची टपरी आहे .मंदिराकडे जातांना शिडी घाटाने आल्यास आपणास सरळ टपरी लागेल. पुढे रस्ता फार अवघड नाही पण हा पार करतांना खरोखर अभयारण्यात आल्याचा अनुभव येतो. वाटेत पडलेली झाडे लागतात, चिखल, रस्त्याच्या दोन्ही बाजुला महाकाय असं दाट जंगल. या ट्रेकला मोजकेच फोटो काढता येतात. कारण म्हणजे पाऊस नि धुके .
         भिमाशंकर ट्रेकला गेल्यावर धुके काय असते हे कळते. शिगरेटचा धुरही त्यात दिसनार नाही असं धुक्याचं साम्राज्य असतं. अखेर १च्या सुमारास आम्ही तळ्यापर्यंत पोहोचलो. तळ्याचं जरी नाव हनुमान तळं असलं तरी आजुबाजुचा परीसर विचीत्र लोकांनी घान करुन टाकलेला कुठे पाय टाकावा तेही कळत नव्हतं. शेवटी तिथे फिरण्याचा मोह टाळला आणि आम्ही समुहातील बाकी सर्व येइपर्यंत वाट पाहीली. सारे जमा झाले आणि ईवलीशी आर्याही उत्साहात वर चढली होती विषेश म्हणजे ति स्वतः पायी चालुन वर आली होती. कुणालाही तिने स्वःताला ऊचलुन दिल नाही. सारयानीच तिचं कोडकौतुक केलं. ईथुन धुके नसतांना खाली दिसणारे हिरवे माळरान मोहक वाटत होते. तळ्यापासून १५ मिनिटात आपण भीमाशंकर मंदिराच्या गेट पाशी आणि १० मि.पायथ्याशी  पोहचतो कारण मंदिर हे खाली आहे. पायरया उतरून खाली जावे लागते. उजव्या हाताला मंदिर, डाव्या हाताला अखिल मुंबई कामगार डबेवाले धर्मशाळा (१९३८)आमची राहण्याची सोय तिथेच होती.
       नंतर निघालो नागफनी पाॅईट कडे. ह्या पाॅइंटच म्हणाल तर त्या डोंगराचा आकार नागाच्या फन्यासारखा आहे. नागफणीच्या रस्त्यावरील हनुमान तळे, सीतारामबाबांचा मठ तेथून काहीशा अवघड वाटेने चढून गेल्यास नागफणी हे भीमाशंकरचे सर्वोच्च शिखर लागते. येथून धुके नसतांना खाली दिसणारे हिरवे माळरान मोहक वाटते. त्या माळराणातुन वर येणारा हवेचा दबाव  प्रचंड असतो काही वेळा तो ईतका प्रचंड  असतो की रुपयाच नाणं देखील खाली जात नाही. महाराष्ट्रात कळसुबाई शिखरानंतर ह्याचा नंबर लागतो. तिथे जाउन खाली पाहील की कळतं आपण खाली कोणत्या लेवलला रेंगाळत असतो. मी तर म्हणेन त्या कँडी क्रशच्या लेवल पार करण्यापेक्षा सृष्टीने दिलेल्या जीवंत नैसर्गीक लेवल पार करण्यात आपलं आयुष्य खर्ची घातलं तर तुम्हाला नक्कीच परमसुखाचा आनंद होईल.
         रोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच वाटावा, यात काहीच आश्‍चर्य नाही. पावसाळ्यात धुक्‍याच्या तरल पडद्याआडून हळूच डोकावणारी वृक्षवल्लरी क्षणार्धात शहरी शीण आणि ताणतणाव घालवून टाकते. पण ईथे मात्र सेल्फी काढण्याचा प्रयत्न करु नये. नाहीतर सेल्फी स्टीक वर आणि आपण खाली. तिथुन परत येताना धुकं आणखीन दाट आणि मुसळधार पाऊसही सुरु झाला. त्याचा स्वछंद आस्वाद घेत आम्ही धर्मशाळेत परतलो.
      मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. दर्शन इथेही तसच गाभारयात पोहचतो न पोहचतो तोच बाहेर ढकळलं जातं. ईश्वराचाही धंदा झाला आहे. विना टॅक्सची कमाई तीही बेहिशोबी. असो पण देव देवळात नाही तर अंतरी शोधावा…
        दर्शन झालं आणि मग धर्मशाळेत जाऊन मस्त पोटपुजा केली आणि पहुडलो. ईथेही झोपेचा बट्याबोळच झाला. आम्ही खोलीत दहाजण होतो त्यातील चारजण घोरणारे वाघ…. रात्र काही फळाला आली नाही. सकाळी धुकं अधीकच दाट झालेलं फ्रेश होउन चहा, शिरा घेउन निघालो परतीच्या प्रवासाला. बैल घाटा मार्गे नांदगावकडे. हा तसा ऊतरायला सोपा घाट काही अंतर धबधब्याच्या मार्गातून जावं लागतं तितकाच काय तो अवघड.
      पावसाची रीपरीप चालुच होती म्हणुन पर्स बॅगेतच ठेवला आणि रस्त्याला खर्चासाठी म्हणुन शंभरची नोट बाहेर ठेवली. कुठं ठेऊ मनात विचार आला नी ती मी मोबाईलच्या बॅक कव्हरच्या मधे ठेवली बॅकव्हर पारदर्शक असल्यामुळे फोटो क्लिक करताना ती दिसत होती. खाली ऊतरेपर्यंत क्लिक करण्याआधी शंभरकडे बघा, फोटो काडायचा असेल तर शंभरची नोट कुठे आहे वैगरे,वैगरे. आता ती आठवण म्हणुन सांभाळुन ठेवावी लागनार एवडं मात्र निश्चित.
          खाली उतरत असताना मधेच शुभांगी ताईचा ( आर्या ची आई ) पाय घसरला आणि त्या पडल्या. त्यांचा पाय मुरगळला  त्यांना उठताच येईना. ताईचा जरी पाय मुरगळला होता पण वेदना मात्र त्या चिमुरडीला झाल्या होत्या.   पुडे जात असलेली आर्या थांबली आणि रडायला लागली ती गपच होईना तिची आई तिला सांगत होती कि मला लागलेलं नाहीये तरीही ती गप होईना. तिच्या आईच्या प्रती असलेलं प्रेम ती चिमुरडी हिरमसून व्यक्त करत होती. काही वेळाने ती शांत झाली. तिच्या उदास मुद्रेने प्रवास पूर्ववत झाला. पुढे परतीचा प्रवास आणि पायथ्याची पोहचलो. मागे वळून पाहिलं तर विश्वास बसला नाही एवडा महाकाय असा पर्वत मी चढून सुखरुप खाली उतरलोय. हुश्श करून सुस्कारा सोडला आणि काही वेळ न्याहाळत राहिलो. पुडे काय नांदगाव ….
         गावात एक बंधारा ओसंडून वाहत होता त्या वाहणाऱ्या पाण्यात  मनसोक्त आंघोळी केल्या आणि निघालो मामाच्या घरी. सदर समूहाचेच  चौकट मामा. तिथेच जेवणाची व्यवस्था होती. फ्रेश होऊन जेवण केलं . अप्रतिम जेवण, खासकरून ठेचा ..
    साऱ्यांचा अभिप्राय म्हणजे अविस्मरणीय अनुभव.  सारेजण उत्साहात होतो, खूप मजा आली, खरं सांगायचं तर समूहाच नियोजन सुरेख ,सुंदर, शिस्तबद्ध असं होतं त्यामुळेच खरतर हा प्रवास नटखट, रुचकर आणि मजेशीर झाला. समूहातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव मनाला भाऊन गेला. त्या सर्वांचे आभार मानावे तितकेच थोडे आहेत. इतक्या लहान वयात पदभ्रमण करीत भीमाशंकर चढून आल्याबद्दल आर्याचा सत्कार करण्यात आला..
         मग काय जो तो आपापल्या मार्गाने घरी. पण ह्या दोन दिवसाची भ्रमंती आयुष्यभर लक्षात राहील. कस असत काही क्षण आपण फक्त अनुभवू शकतो ते शब्दात व्यक्त करता येत नाही. हा लेख जरी मोठा असला तरी सारंच व्यक्त करता नाही आलं. पण सृष्टीने आपल्या पुढ्यात भरपूर वाढून ठेवलंय ते फक्त पाहण्याची, अनुभवण्याची गरज आहे.

खांडस गावी सुंदर मंदिर मारुती रायाचं
तेथून दिसे सुंदर लोभस दृश्य पदर गडाचं

प्रचंड गर्द झाडी कडे कपारी पाषाण
श्रावणात हिरवा शेला डोई ढगांचा पदर

धवल झऱ्यांचा साज कसे सजले भीमाशंकर
वाट बिकट पार कराया निघाले गिर्यारोहक

पाऊले झपाझप सरळ उभा मधेच शिढीघाट
जंगलाची वाट पावसाची दडी डोंगर यात्री हैराण

एका मागून एक चढे, डोंगर यात्री सर्रास…
चढता शिढी वर काही न दिसे पहा धुक्यात

चहुबाजूनी जर्द झाडी पक्षांचा सुमधुर आवाज
सळसळती झाडांची पाने वरुनी पावसाचा वर्षाव

मधेच येई कोसळणाऱ्या प्रणय झऱ्यांचा आवाज
शीरी पोहचलो तळ्याशेजारी बैसलो दाट धुक्यात

पायथ्याशी सज्ज मारुतीराय वर तळ त्या रानात
शोभे सुंदर मंदिर महादेवाचं सह्याद्रीच्या कोंदणात

प्रवास सुंखद, नटखट,मजेशीर सानिध्य निसर्गात
पाहावा निसर्ग डोळा भरून सह्याद्रीच्या कुशीत….

नितेश ज्ञानेश्वर पाटील (पालघर,धनसार)
९६३७१३८०३१

माझा पहिला परदेश प्रवास

अविस्मरणीय क्षण….१३.६.१५ ते १६.६.१५
        सामान्य व्यक्तीने दुबई फिरायला जाणं म्हणजे भाग्यच म्हटले पाहीजे. पण मित्राच्या सहकार्याने आणि परमेश्वर कृपेने दुबई जाण्याचा योग आला. एक ईच्छा होती की परदेशी जाऊन यायचं तिथली लोकं, वस्ती, न्याय व्यवस्था, संस्कृती पाहून यायची.
             
     पाहता पाहता जाण्याचा दिवस ऊजाडला. पाहटे साडेतीन वाजता घरुन निघालो. विमानतळावर साडेपाचला पोहचनं गरजेचं होतं. कारण फ्लाईट साडेआठचं होतं. विमानात पहिल्यांदाच बसनार म्हणुन कमालीची ऊत्सुकता मला होती. आणि पोहचलो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई…
बाॅंबेला मुंबई आणि मुंबईच्या विमानतळाला छत्रपति शिवाजी महाराजांचं नाव देऊन महाराजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेउन ज्यांनी शिवभक्त असल्याची खरी ओळख दिली त्यांस मानाचा मुजरा.. प्रत्येकाला छत्रपति शिवाजी हे नाव आदराने घ्यावच लागतं..! नुसतं शिवाजी नाही..छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ..!!!! छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे नावच ईतकं दमदार की तिथे पोहचल्यावर भरुन आलं. आतमधे प्रवेश घेऊन जाणवलं की आधुनिक सुविधांचे जागतिक दर्जाचे टी २ टर्मिनल आणि त्याला महाराजांचं नाव. कीती अभिमानाची गोष्ट. पण ते कार्यान्वित झाल्याला आता वर्ष दिड वर्ष उलटले. टर्मिनलने अनेक पुरस्कार मिळविले. परंतु, नावात दिमाखाने महाराजांचे नाव असलेल्या विमानतळावर स्वतः महाराजांचे अस्तित्व मात्र अजूनही उपेक्षितच होते. शिवरायांच्या अर्धपुतळ्यासह टी२च्या नव्या प्रवेशरस्त्यापाशी बांधण्यात येणारे दालन अजूनही पूर्ण नव्हते. आता त्याचं अनावरण झालाय. विमानतळावर तर सात हजार कलावस्तूंचे सुबक देखावे आहेत. सारेच नाही पहिले पण जे पहिले ते अप्रतिम होते. आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यामागची भूमिका परदेशातून महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवणार्‍या प्रत्येकाला हा महाराष्ट्र कोणाचा आहे याची जाण व्हावी व महाराजांना सलाम करूनच महाराष्ट्रात पाऊल टाकावे, हीच त्यामागची भूमिका असावी.
          
आतमध्ये प्रवेश करून एक छोटासा फॉर्म दिला जातो तो भरून तिकीट आणि पासपोर्ट यांवर शिक्का बसला कि बाजूलाच चेक इन करून बॅगा लगेज बेल्टवर रवाना केल्या जातात. (लगेज बॅगच वजन निर्धारीत ३५ kg आणि सोबत असलेल्या बॅगच ७kg निर्धारीत) आणि आम्ही मध्ये एन्ट्री केली. आता प्रतीक्षा… प्रतिक्षालायत मात्र स्मशान शांतता असते. जो तो आपल्या विश्वात दंग. त्यात वावगं नाहीये पण आपापसात बोलताना तरी माणसांनी मुक्त असावं इतकंच. तसे आम्ही 31 जन होतो आणि उत्साही हि. बरेच जण अपरीचीत असले तरी समूह म्हंटला कि बंध जुळतातच.
बसस्थानकावर बस येऊन थांबावी तसं ते धूड येऊन थांबलं होतं. आतमध्ये प्रवेश करण्या आधी हवाई सुंदरीने आम्हचं स्वागत केलं. खरतर त्या हवाई सुंदरींना इच्छा नसतानाही काही वेळेस आपल्याशी बळजबरीने हसावं लागतं असेल का हा प्रश्न मनात येऊन गेला. शेवटी ते क्षेत्रच असं आहे कि पर्याय नाही. ते स्मितहास्य घेऊन पुढे वातानुकूलित प्रशस्थ अश्या विविध सुविधांनी सज्जित असलेल्या विमानात माझी जागा शोधून मी बसलो. खरंतर अजूनही मी स्वप्नात आहे कि काय असा भास झाला. आकाशात उंच असणारे विमान पाहून त्याच्या मागे पाळणारा मी आज चक्क त्या विमानात बसून उडणार होतो. पण माणूस कितीही उंच गेला तरी त्याचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले असावेत याचं स्मरण का कुणास ठाऊक..!! पण झालं. जेंव्हा विमान उड्डान घेतं तेंव्हा एवढ मोठे धुड आकाशात कसं झेप घेत ह्याचे राहून राहून आश्चर्य वाटतं. उड्डानानंतर लगेच आपल्या ओळखिच्या जागा शोधून काढण्याचा खेळ खेळला जातो. विमानाच्या खिडकीतून बाहेर बघणेही मी खूप एन्जोय केलं. जाताना खिडकीजवळ जागा नाही मिळाली पण येताना मात्र मीळाली होती. ढगांच्या मधून जाताना अजूनही मन ढग पकडून ठेवायचा प्रयत्न करते. कधीतरी दुरवर नुसता ढगांचा समुद्र असतो, निळं आकाश, ढग आणि आपण एवढच. ढगातून जेव्हा विमान पुढे जातो तेव्हा आपल्या खड्ड्यातील रस्त्याची आठवण येते. म्हणजेच अवकाशातही रस्त्याची समस्या आहेच. पण ते नैसर्गिक आहे. अन हे दलाल निर्मित. असो… नदीची वळणं, रात्रीच्या वेळी सुंदर तारका दिसतात. मिणमिणारे दिवे दिसतात.
    विमानातून उतरले की एक पासपोर्टवर शिक्का आणि थेट गमन बग्गेज क्लेम कडे. तिकडेही बरेचवेळा तात्कळत रहावे लागते. बेल्ट वरून बॅग उचलण्याची धड्पड चालू असते. एकदा ती हातात आली की मग प्रवास संपला. प्रवास संपला की पुन्हा एक उदासिनता निर्माण होते.
             आणि पोहचलो दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. दुबई ची ओळख म्हणजे  ग्लोबल शहर, प्रवासी शहर, उंच उंच इमारतींचे,  सोन्याचा धुर निघणारे शहर, बॉलीवूड लोकांचे आवडते शहर, अंडर-वल्ड लोकांचे शहरही असे ऐकिवात आहे. प्रत्येक इमारतीची रचना किती वेगळी आहे. पत्त्यातल्या गगनचुंबी  इमारतीच  जणू.  बिल्डींग  आर्की टेक्चर चे अदभुत नमुने.
          विमानतळावरुन बाहेर निघालो आणि जसं कुणी गरम भट्टीपाशी आणुन सोडलय असं वाटलं. ४८° ते ५१° सेल्सीअस तापमान होतं ते परतेपर्यंत तसचं राहीलं. तसा सर्व प्रवास, राहणं, फीरणं AC तच झालं म्हणा. तिथे बस स्टॅाप पण AC च आहेत तुम्ही जीथे जाल तीथे AC. बाकी पर्यायच नाहीये.
संयुक्त अरब अमिराती (युनायटेड अरब एमिरेट्स). दुबई हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब शहर ह्या देशामधील सर्वांधिक लोकसंख्येचे शहर व अबु धाबीखालोखाल आकाराने दुसऱ्या क्रमांकाच शहर आहे. दुबई शहर दुबई अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. दुबई-अजमान-शारजा ह्या महानगरामधील सर्वात मोठे शहर असलेल्या दुबईची लोकसंख्या २०१३ साली सुमारे २१ लाख होती. त्यामध्ये स्थानीक अमीराती वंशाचे १६ ते १७ %, भारतीय ६० ते ६४ %. म्हणजे बघा आपलाच देश आहे कि नाही…आणि बाकी ईतर….. दुबई हे एक जागतीक शहर असून मध्य पूर्व व दक्षिण आशिया भागातील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र व वाहतूककेंद्र आहे.
      २०१४ साली दुबईमधील हॉटेलांचे भाडे जगात दुसऱ्या क्रमांकावर होते. येथील राहणीमानाचा दर्जा उच्च प्रतीचा असून ते निवाससाठी जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते आणि त्याचा प्रत्ययही आला. परंतु येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या दक्षिण आशियाई कामगार व मजूर वर्गाचे शोषण करून त्यांना अमानुष वागणूक दिल्याच्या वृत्तांमुळे दुबईवर मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचा देखील आरोप केला जातो. पण जोवर होतो तोवर तसं काही निदर्शनास आलं नाही. ते चार पाच दिवसात माहीत पडनं तितकं सोपही नाही म्हणा ..
      दुबई विमानतळही जगातील आघाडीच्या व वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे. माझा पहीला विमानप्रवास तसा छानच होता. विमानतळावर मला जाणवणारा माझा सर्व उत्साह जेंव्हा मी विमानाच्या गेटपाशी पोचलो तेंव्हा निघून गेला. बोअर्डींगच्या आधी सर्व लोकं बाहेर बसली होती. आम्ही सोडले तर बाकी इतकी निरुत्साही, मरगळलेली लोकं मी आयुष्यात पहील्यांदीच पाहीली. फारच निराशाजनक वातावरण होत ते. एकही हायफाय, प्रसन्न चेहर्याचे व्यक्तीमत्व दिसत नव्हते. जो तो आपल्याच धुंदीत मस्त. अश्या लोकांबरोबर दुबईत जाणं मला मानसीकदृषट्या परवडलच नसतं पण आमचा ३१ जणांचा ग्रुप होता. तो ही लय झकास म्हणुन काही वाटलं नाही.
        तिथे पहिलीच सफर केली ती डेजर्ट सफारीच. भर वाळवंटात मोठमोठ्या गाड्या उलटसुलट चालवणार. तुम्ही ती महिंद्रा स्कॉर्पिओ ची जाहिरात पाहीलीच असेल ज्यात एक ललना वाळवंटात उभी असते आणि तिकडून वाळूवरून उड्या मारत स्कॉर्पिओ येते तोच हा प्रकार… प्रत्यक्षात ती जाहिरात अतिशय सौम्य वाटावी अशी. पण असे जोरजोरात दणके बसतात काय सांगू..!! आमच्या गाडीत बसलेले म्हणाले की गाडी पलटीही होते म्हणे… आणि त्यात ड्रायवरने होकार मिळवला..!!!” झालं माझी भिती वाढली पण जीव मुठीत घेऊन करू म्हटलं आपण वाळवंट पार, अर्थात उत्सुकता तर होतीच……..
         मधे एका ठिकाणी गाड्या थांबल्या…..ईथे नेहेमी ग्रूप बुकिंग होते, एकाच वेळेस अनेक गाड्या निघतात, मग एकाने एका उंच टेकडीवरून उडी मारली की दुसरा आपली गाडी त्याच्याही वरच्या टेकाडावर नेतो. थांब्यावर गाड्यांच्या टायरमधली हवा काढण्यात आली . जास्त दणके बसायला नको म्हणे नानाची टांग’ म्हटलं तुमच्या…!! बसायचे तेव्हढे दणके बसलेच सगळ्यांना. एकदाचे आम्ही वाळवंटात अवतरलो. रेसकोर्स वरच्या घोड्यांसारख्या गाड्या लावल्या गेल्या. जोरजोरात गाणे लावले. आणि मग झाली ती धुमश्चक्री सुरू…गाडी सुरु झाल्यानंतर पहिल्या ५/१० मिनीटातच मी ओळखले आपले काही खरे नाही आज…पण नंतर हायसं वाटलं. सफारीची सफर चांगलीच…
तिथून पुढे होता डेजर्ट कँम्प. तिथे रात्रीचे जेवण आणि बरोबरच्या पुरूष मंडळाचे मुख्य आकर्षण ” बेले डान्स ” होते. गप्पा टप्पा, जेवण सुरु झाले आणि मग अवतरली ” नॅनी ” नावाची बेले डान्सर… तिच्या थिरकणाऱ्या पावलावर ग्रूपमधल्या सर्वानाच उत्साह आला आणि अनेक जन नाचण्याची संधी साधून आले. विसरलोच किरीट सोमैया आणि त्यांच्या सौभाग्यवती ही होत्या तिथे तो आस्वाद घ्यायला….
दुबैमधील गोल्ड मार्केट खरा सोना पाहण्यासारखे आहे. तब्बल १०६ दुकाने आहेत त्यात बहुतांशी दुकाने भारतीयांची आहेत. विशेष म्हणजे तिथे सिक्यूरीटी म्हणून एक पोलिस वॅन आणि एक पोलीस बस…
          तदनंतर दुबई चीच नव्हे जगातील एक अविश्वसनिय वास्तु…….बुर्ज खलिफा
       ही जगातील दुबई स्तिथ मानवनिर्मित सर्वात उंच इमारत  ही संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक गगनचुंबी इमारत. एकूण 829.84 मी (2,723 फूट) इतकी उंची असणारी बुर्ज खलिफा… ह्या इमारतीत १६३ मजले आहेत. याच्या एकूण मजल्यांपैकी ३८ मजल्यांत हॉटेले व कार्यालये इत्यादी आहेत. आतमध्ये सुरवातीलाच असणाऱ्या मॉलमध्ये डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य. महाकाय अश्या मत्स्य तलावाचे इथे निर्माण केले आहे. ज्यामध्ये विविध प्रकारचे दुर्मिळ मासे जे आपल्याहूनही जास्त उंचीचे सैर करताना दिसतात. त्या तलावाच्या खालून अर्धवर्तुळाकार पारदर्शी रस्ता ज्यातून ट्रेलर जाईल इतका मोठा आहे. तुम्ही स्विमिंग ड्रेस घालून त्या तलावात माश्यांचा संगतीने संचार करू शकता. अर्थात त्याचही तिकीट आहे. वर छतावर मिनमिनणाऱ्या असंख्य दिव्यांचे चलत परिवर्तित होणारे दृश्य म्हणजे जणू आपण चांदण्या आकाशात असल्याचा भास होतो. तदनंतर आम्ही गगणाशी भिडलेल्या वास्तूशी एकरूप होण्यासाठी पुढे गेलो. जगातील सर्वात वेगवान लीफ्ट ह्या वास्तूमध्ये आहेत. १३२ मजले आणि फक्त १ मिनिट आणि ४ सेंकंद. विश्वासच बसला नाही. पण आम्ही पोहचलो होतो. वर हवेचा दबाव ईतका होता की कान बंद झाले होते. तशी ईमारत हि हवेमधे थोडी हरकत करते हे जाणवलं. वरुन चहुबाजुनी पुर्ण दुबई दिसत होती रस्ते, ईमारती, बगीचे ,समुद्र सारंकाही. ते म्हणतात ना ..!! सुंदर आणि सुशोभीत…खाली आल्यानंतर नेत्रदिपक असे संगीताच्या तालावर नाचनारे बागडनारे कारंजे पाहीले. याचा रंग, लय, ताल भन्नाटच…
       तदनंतर बुर्ज अल अरब आणि जुमेरा बीच….
हे संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक आलिशान सप्त तारांकित हॉटेल आहे. ३२१ मीटर (१,०५० फूट) उंच असलेली बुर्ज अल अरब ही संपूर्णपणे हॉटेल म्हणुन वापरली जाणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. बुर्ज अल अरब दुबईच्या जुमेराह बीचपासुन २८० मीटर अंतरावर एका कृत्रिम बेटावर बांधण्यात आले आहे व त्याचा आकार साधारणपणे जहाजाच्या शिडासारखा आहे. बुर्ज अल अरब हे जगातील सर्वात महागड्या हॉटेलपैकी एक मानले जाते. ह्या हॉटेलमध्ये २०२ खोल्या आहेत.
       हॉटेल अटलांटिस ……हे आहे पाम जुमेरा नामक कृत्रिम बेटाचे  एक चित्ताकर्षक  दृश्य. पाम जुमेरा हे एक  खाजुर झाडाच्या आकाराप्रमाणे  पाण्यात तयार केलेले एक बेट . त्याला १६ फांद्या असून त्यावर बंगले वसवले आहेत. त्यातील अटलांटिस हॉटेल हे खास आकर्षण आहे.  पाम  जुमेराचा वरतून दिसणारा दृश्य लाजवाबच. यात म्हणे मोठ्या बॉलीवूड स्टार  लोकांचीही घरे आहेत. पाम  जुमेरा हे स्वतःच स्वताला ‘जगातील आठवे आश्चर्य’ म्हणवतात. पाम जुमेराच्या   शेवटच्या टोकाला अटलांटिस  हॉटेल आहे. एका बाजूला अटलांटिसची  भव्य-दिव्य लखलखती  इमारत आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या-मोठ्या दगडांच्या पलीकडे पसरलेला अथांग समुद्र.
    खरोखरच माझ्या आयुष्यातील हे अविस्मरणीय क्षण. नंतर परतीचा प्रवास पुन्हा दुबई विमानतळ ते छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळ मुबई. ह्या चार दिवसाचा प्रवास म्हणजे एक पर्वच. तिथे राजेशाही अजून जिवंत आहे आणि न्यायव्यवस्था हि उच्च प्रतीची. सर्वच क्षेत्रात नियमांचं पालन तंतोतंत केलं जातं. तसा एक किस्सा घडला शेवटच्या टप्प्यात. हॉटेलमधून ५.३० चा चेक आउट टाईम आणि त्यानुसार आमची बस विमानतळावर जाण्यासाठी सज्ज होती. काहीजण खरेदीसाठी जे गेले होते त्यांना उशीर झाला. आम्ही खूप विनवण्या केल्या पण खाजगी असून दहा मिनिटही त्यांच्या साठी बस थांबली नाही. शेवटी स्वखर्चाने त्यांना यावं लागलं. आणि इथलं चलन म्हणजे आपले सोळा रुपये तेव्हा त्यांचा एक रुपया. तिथे नियम आणि वेळ काटेकोरपणाने पाळणारी व्यवस्था आहे. आणि राष्ट्र उन्नतीसाठी ते गरजेचं आहे.
    नितेश ज्ञानेश्वर पाटील (पालघर,धनसार)
०९६३७१३८०३१

सह्याद्रीच्या पर्वत रांगा

सह्याद्रीच्या पर्वत रांगा
गाजल्या त्या शौर्याने
स्मरता ते शौर्य तयांचे
छाती फुलते गर्वानी

नित