आज एक लेख वाचनात आला त्या अनुषंगाने ….
या विश्वात माणसाची उत्पत्ती कशी झाली ?
म्हणजेच पृथ्वीवर सजीव कसे निर्माण झाले ?
आणि सजीवातील प्रजनन यंत्रणा निसर्गाने कशी निर्माण केली असावी ?
शंकाच आहे ना..!!
माणूस आज इतका प्रगत झाला तरी याबाबतीत त्याच्या मनात मतभिन्नता आहे. वैज्ञानिक दृष्टीने आणि आध्यात्मिक दृष्टिने या प्रश्नांची उत्तरे समाधान कारक देण्याचा प्रयत्न केला तरी ती उत्तरे समाधानकारक नाहीत.
पण अध्यात्माच्या दृष्टीने पृथ्वीवरील सजीवसृष्टी, सर्वव्यापी सर्वशक्तिमान ईश्वराने निर्माण केली. इथे प्रश्न संपतो. आणि विज्ञानाच्या दृष्टीने हि सजीव सृष्टी योग्य परिस्तिथी आणि घटक जुळून आल्यामुळे स्वयंभुरीत्या अस्तित्वात आली. अरे असे कसे घटक जुळून येतील त्याला जुळवणारही असेलच कि…
मुळात या पृथ्वीवर अगणित प्रकारचे जीव आहेत. थॉमस हेन्री हक्सले यांनी १८६३ साली माकडांच्या काही प्रजातीत उत्क्रांती होऊन मानवाची निर्मिती झाली असे विश्वासपूर्वक जाहीर केले. पण प्रश्न असा आहे कि या वसुंधरेवर त्या अगणित जीवांपैकी फक्त माकडांचीच उत्क्रांती कशी झाली आणि पूर्णतः का झाली नाही. इतर प्राण्यांमध्ये तसे बदल का नाही झाले. बरं त्यांच्यात झाली तर ती प्रजाती अजून अस्तित्वात कशी !! हि मनात शंका आहे. असो…
चार्ल्स डार्विन यांनी १८५९ साली ओरिजिन ऑफ स्पेसिज या ग्रंथात पृथ्वीवर आधीच अस्तित्वात असलेल्या प्रजातीत पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी कशी उक्रांती झाली आणि प्रबळ प्रजाती कशा निर्माण झाल्या याचे विवेचन आहे. पण पृथ्वीवर मुळातच सजीव कसे निर्माण झाले याविषयी उल्लेख किव्हा चर्चा नाही.
१८व्या शतका अखेरीस डार्विनने पृथीवरील उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला पण त्याच्याही आधी हजारो वर्षांपूर्वी भारताच्या ऋषिमुनींनी विष्णूच्या दशवतारात हाच सिद्धांत मांडला आहे. ३.५ अब्ज वर्षांपूर्वी सागरी सजीवांपासून आजच्या मानवापर्यंतची सजीवांची उक्रांतीच सांगितली आहे.
दुसरी गोष्ट अशी कि सजीवातील प्रजनन यंत्रणा निसर्गाने कशी निर्माण केली असावी ? म्हणजेच नर आणि मादी. प्रजननासाठी लागणारे अनुवंशिक तत्व आणि ते जनक पिढ्यातून अपत्य पिढ्यात संक्रमित होण्यासाठी आज्ञावल्या कश्या निर्माण झाल्या असाव्यात..?
निश्चितच यामागे एक अदृश्य शक्ती आहे. आणि तीच शक्ती हे विश्व चालवते हे नाकारता येणार नाही. या विश्वात अगणित प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच ती अदृश्य शक्ती. म्हणजेच ईश्वर. आज साहित्य क्षेत्रात जगातील सर्वात जुनं आणि प्रथम साहित्य म्हणून वेदांचा नावलौकिक आहे. आणि चारही वेद हरीचे गुणगान गातात ते उगा नाही. पाचवा वेद गणला जाणाऱ्या तुकोबांच्या गाथाही त्या अखिल कोट ब्रह्माण्ड नायक पांडुरंगाचे गुणगान गातात ते उगा नाही.
याही पलीकडे तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच ईश्वराची अनुभूती येईल…
…नितेश पाटील
